बुधवार, १९ नोव्हेंबर, २०२५

केनियाचे अंतरंग

अरबी समुद्र ओलांडताना- मुबई ते नैरोबी रात्री पावणे तीन वाजता निघालेले विमान साडे सहा तासांनी नैरोबीच्या आसपास पोचले तेव्हा बाहेर जोराचा पाऊस चालू होता. भारतीय आणि केनियन वेळेत फक्त अडिच तासांचा फरक होता, त्यामुळे सकाळी सातच्या दरम्यान विमानतळावर उतरलो. इमिग्रेशन वगैरे भाग उरकण्यात व बॅगा हस्तगत होईतो थोडा वेळ गेला. केनियन विमानतळ व्यवस्थापन संथ चालते. या बद्दल आधी वाचले होतेच. विमानतळाबाहेर आम्हाला घ्यायला आलेला "मुटूला" हा ड्रायव्हर आणि गाईड दोन्ही (डिक्सन) आमची वाटच पहात होता.. सामान सफारीमध्ये चढवलं.. आणि एका रेस्टॉरंट मध्ये नाष्टाचहा उरकून अंबोसेलीच्या दिशेने निघालो. नैरोबी अंबोसेली 230 किमी अंतर. मध्ये मध्ये किरकोळ घरांच्या वस्त्या. हायवेवर स्थानिक स्त्रिया वस्तू, फळे विकण्यासाठी उभ्या दिसतात. दुभाजकाशिवायची दुहेरी वाहतूक. तीही अव्याहत. मुटूला म्हणाला, कधी कधी दोन्ही वाहनांमध्ये सापडतील याची भिती वाटते. कधी कधी रस्त्याकडेला फळांनी लगडलेल्या विक्रेत्यांच्या ढकलगाड्या ओळीने उभ्या दिसत. विराट क्षितीजा पर्यंत पसरलेले माळांमागून माळ, क्वचित अधेमध्ये काटेरी झुडूपं. याच दृष्यांची सततची पुनरावृत्ती. "हा रस्ता पुढे मोंबासा पर्यंत जातो-" मुटूलाने माहिती पुरवली. या नुसत्या उल्लेखाने वाचलेल्या इतिहासाच्या अश्वत्थाची पाने सळसळू लागली. मोंबासा..मालिंदी या बंदरावर वास्को द गामा 1498 साली भारतात जातांना थांबला होता, आणि विस्कळीत झालेली मोहिमेची त्यानं परत जुळवाजुळव केली होती. त्याच्या ताफ्यात जन्मठेपेसारखी कठोर शिक्षा झालेले कैदी या मोहिमेत त्याला खलाशी म्हणून सोबत राजाने दिलेले होते. ते क्रूर होते. कुणाचाही जीव घ्यायला ते कमी करत नसत.नाहीतरी त्या शिक्षेतून वाचायचा एवढाच एक मार्ग त्यांच्या साठी शिल्लक होता. वास्को ने दोन कैदी मोंबासाच्या राजाकडे हेरगीरी करायला पाठवले होते. हस्तिदंत असलेल्या जहाजांची लुटालुट केली होती. तिथल्या किना-यावर वास्को ने आपल्या पोर्तुगीज राजाचा एक स्मृतिस्तंभ स्थानिक राजाची परवानगी घेऊन उभा केला होता. हा किनारा सोडल्यावर वास्कोची टीम 20 दिवसांनी कालिकत येथे पोचली होती. निळंभोर आकाश, पांढुरके ढगांचे पुंजके यांची सोबत सुरू झाली. हळूहळू झुडुपांमधून झेब्रे, जिराफ डोकाऊ लागले.. आणि हा लांबचा प्रवास एक्साईटमेंटमुळे सजिव झाला.. मध्ये हॉटेलच्या शोधात इमाली या ठिकाणी थांबलो.. तर तिथं शिल्पं, चित्रं, काष्ठशिल्पं याचं एक वर्कशॉपच समोर आलं.. मध्येच पावसाची भूरभूर आली आणि गेलीही. आता झाडा झुडपातून झेब्रे, एखादं हरिण, छोटेमोठे जिराफ हटकून दिसू लागले.. शेवटी दुपारी डेस्टिनेशन सापा लॉज इथं पोचलो. हॉटेलच्या पोर्चमध्ये शिरल्याक्षणी सात फूट उंच, धिप्पाड मसाई गृहस्थ सामोरा आला.. दुपारी हवेत गरमी असल्याने थंडगार पाण्याने ओले केलेले नॅपकीन वाटले गेले. वेलकम ड्रिंक आलं. मातीच्या भिंती, झावळ्यांचे छप्पर, पण आतुन अद्ययावत असणा-या रुमस्. आपापल्या रुममध्ये आराम करून दुपारच्या सफारी साठी सज्ज झालो. -𝓡𝓪𝓳𝓪𝓷 𝓚𝓾𝓶𝓫𝓱𝓪𝓻